विधानभवनात युध्द परिस्थितीचा सराव   

एनडीआरएफ, पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी

पुणे : विधान भवन परिसर, दुपारी चारची वेळ, प्रथम भोंगा वाजला, लगेच धोक्याची घंटा म्हणून सायरन वाजला. त्यानंतर एकापाठोपाठ तीन स्फोट झाले अन सगळीकडे पळापळ सुरु झाली. सर्व नागरिक सैरभर धावू लागले. जीवाच्या आकांताने काही जण जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळू लागले. तर काही जण आपल्या बरोबर सहकार्‍यालाही मदत करत सुरक्षित स्थळी नेत होते. तर काही वेळातच आग्निशमन दलाचे पाच-सहा बंब घटनास्थळी दाखल झाले, आग नियंत्रणात आणण्यासाठी ते प्रयत्न करु लागले. १०८ रुग्णवाहिका (अ‍ॅम्बुलन्स) दाखल झाली आणि जखमींना उपचार देण्याचे प्रयत्न सुरू झाले. पाठोपाठ बॉम्ब स्कॉड पथक, एनडीआरएफ, एनसीसीचे पथक आणि पोलिस प्रशासनही मदतीसाठी घटनास्थळी दाखल होत मदत कार्य सुरू झाले.
 
मात्र, हे सर्व मॉक ड्रिल असल्याचे कळाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीत काळजी घेण्याच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील पुणे विभागीय आयुक्त कार्यालय (विधान भवन), पुणे महानगरपालिका, वनाज औद्योगिक वसाहत, मुळशी पंचायत समिती, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि पिंपरी-चिंचवड महापालिका या सहा ठिकाणी बुधवार  दुपारी चारच्या सुमारास मॉक ड्रिल घेण्यात आली. मॉक ड्रिलची गांभीर्य लक्षात घेता सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने काम करत नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या मॉक ड्रिलबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली होती. यामध्ये नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक कर्नल प्रशांत चतुर, एनसीसी पुणे मुख्यालयाचे कमांडिंग ऑफिसर कर्नल निशाद मंगरुळकर, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, पुणे ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक रमेश चोपडे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकाजयांनी यांच्या उपस्थितीत आढावा घेण्यात आला.

मॉक ड्रिलमध्ये या विभागांचा होता सहभाग...

विधान भवन येथे पार पडलेल्या मॉक ड्रिलमध्ये केंद्रीय संरक्षण दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका, आरोग्य विभाग, अग्निशमन दल, महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरु युवा केंद्राचे समन्वयक आदी सहभागी झाले होते.
 
केंद्र सरकारने युद्धजन्य परिस्थितीत देशाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने मॉक ड्रिल करण्याचे सर्व राज्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार मंगळवारी आपण तीन ठिकाणे निश्चित केली होती. बुधवारी पुणे महापालिका, पिंपरी महापालिका आणि वनाज औद्योगिक वसाहत अशा आणखी तीन ठिकाणी मॉक ड्रिल घेण्याचे नियोजन अचानकपणे केले. कारण, आपल्याला अचानकपणे या परिस्थितीला कसे सामोरे जायचे हे तपासायचे होते. कारण, युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचविण्यासाठी खबरदारी घेण्याच्यादृष्टीने दक्षता म्हणून मॉक ड्रील घेत आहोत. यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जीवितहानी टाळण्याच्यादृष्टीने विविध प्रात्यक्षिके करण्यात आली. या मॉक ड्रिलमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागाचे जवळपास ३०० च्या वर अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. या मॉक ड्रिलमध्ये आपण आगदी २० ते २५ मिनिटांत सर्व परिस्थिती यशस्वीपणे आटोक्यात आणली आहे.  

- जितेंद्र डूडी, पुणे जिल्हाधिकारी

Related Articles